सोलापूर : साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादित न करता उपपदार्थ निर्मिती केली, तरच सभासदांना जादा दर देता येईल. त्यामुळे कारखान्यांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी केले.
अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार यशवंत माने अध्यक्षस्थानी होते. साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, राजश्री पाटील, डॉ. विनिता पाटील, ॲड. प्रियंका पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, रामचंद्र शेळके, अनिल कादे, भारत सुतकर, शिवाजी चव्हाण, दुध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, यंदा अनेक भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे साखर कारखाने चालविणे अवघड झाले आहे. अनेक का रखाने ऊस उपलब्धतेसह इतर कारणांनी अडचणीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत लोकनेते साखर कारखाना कर्जमुक्त करण्यात आला ही कौतुकास्पद बाब आहे.
माजी आमदार राजन पाटील यांनी चालू वर्षी साखरेला चांगला भाव मिळाल्याने सभासदांना गेल्या वर्षीच्या उसाला दिवाळीसाठी प्रती टन शंभर रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा केली.