पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १० लाख २३ हजार ४२५ टन उसाचे गाळप केले असून ११.६३ टक्के साखर उताऱ्यासह ११ लाख ५० हजार क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या ३८ व्या गाळप हंगामाची सांगता शुक्रवारी झाली, त्याप्रसंगी शेरकर बोलत होते. सुमित्राताई शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक, कार्यकारी संचालक भास्कर घुले, ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदार, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हंगाम यशस्वी केल्याबद्दल कामगारांना १० दिवसांचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कारखान्याने सह वीजनिर्मिती प्रकल्पातून ४ कोटी १२ लाख ६३ हजार २०० युनिट वीज निर्यात केली. डिस्टिलरी प्रकल्पातून ९५ लाख १७ हजार ८३९ लिटर अल्कोहोलची व ७० लाख ७९ हजार ७५८ लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे. यंदा कार्यक्षेत्रात गाळपासाठी २६,०१० एकर ऊस उपलब्ध होता. सरासरी एकरी टनेज ४३.७८ टन मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत या हंगामात जादा गाळप झाले आहे.
कार्यकारी संचालक घुले यांनी ‘विघ्नहर’चा नव्याने ६५ केएलपीडी क्षमतेचा विस्तारित इथेनॉल प्रकल्प या हंगामात पूर्ण क्षमतेने चालविला गेला असे सांगितले. उपाध्यक्ष अशोक घोलप यांचे भाषण झाले.हंगामाच्या सांगतेनिमित्त कारखाना कार्यस्थळावर हर्षल आणि साक्षी घोलप या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. निवृत्त झालेल्या ४१ कामगारांचा सत्कार करण्यात आला. अरुण थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक धनंजय डुंबरे यांनी आभार मानले.