कोल्हापूर : शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत उत्पादित शाहू पोटॅश खत व सल्फरलेस साखर या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचा प्रारंभ कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले की, साखर निर्मितीला पूरक व्यवसायाची जोड गरजेची आहे, ही दृष्टी दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी वीस वर्षांपूर्वी ठेवली. त्यांनी शाहू साखर कारखान्यात नवनवीन उपपदार्थांची निर्मिती करण्यास, आधुनिक तंत्रज्ञान आणण्यास प्राधान्य दिले. आजही ‘शाहू’ची व्यवस्थापकीय व प्रशासकीय वाटचाल त्यांच्याच विचाराने सुरू आहे.
समरजित घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखाना इतिहासातील १७० कोटी रुपयांचे सर्वात मोठे विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. कारखाना मार्च महिन्यात गळितासाठी येणाऱ्या उसास प्रती टन ३४०० ऊस दर देणार आहे. कारखान्यानेच सर्वात आधी अनुदान योजना आणली. यावेळी सुहासिनीदेवी घाटगे यांचेही भाषण झाले. प्रकल्पाची यंत्रसामग्री पुरवठा करणारे कंपनीचे प्रतिनिधी व सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्या प्रतिनिधींचा, राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासद केरबा माने (कौलगे) यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील आदी उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले