जसपूर : नादेही साखर कारखान्यामध्ये वीज उत्पादन करणाऱ्या टर्बाइनमधील तांत्रिक बिघाडामुळे ऊस गाळप तसेच साखर उत्पादन बंद पडले आहे. भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी साखर कारखान्यात जाऊन मुख्य अभियंत्यांची भेट घेतली. कारखान्याच्या सद्यस्थितीची त्यांनी माहिती घेतली. मुख्य अभियंता अभिषेक कुमार यांनी भाकियूच्या सदस्यांना सांगितले की, शनिवारी सकाळी कारखान्यामध्ये टर्बाइनचा अल्टरनेटर खराब झाल्यामुळे वीज उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे मशिनरीत बिघाड झाला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार यामुळे ऊसाचे गाळप आणि साखर उत्पादन ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत ऊस पुरवठा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टर्बाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत टर्बाइनमधून विजेचे उत्पादन सुरू होईल. त्यानंतर ऊस गाळप आणि साखर उत्पादनही सुरू केले जाईल. यावेळी भारतीय किसान युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेम सहोता, अमन प्रीत सिंह, जगजीत सिंह, चौधरी किशन सिंह, धर्मेंद्र सिंह, गुरप्रीत सिंह आदी उपस्थित होते.