पुणे : इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी – बावडा येथील युवा शेतकरी विकास शिशुपाल शिंदे यांनी तीन एकर उसात कलिंगडाचे आंतरपिक घेतले आहे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला चांगली मागणी असते. त्यामुळे भाव देखील चांगला मिळतो. याचा विचार करूनच कलिंगडाचे आंतरपीक घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. हवामानाने साथ दिल्याने कलिंगडाचे पीक जोमदार आले. दोन दिवसांपासून कलिंगडाची तोडणी सुरू झाली आहे.
सध्या कलिंगडाची तोडणी सुरू झाली आहे. एकूण ५० ते ६० टन उत्पन्न निघेल, असा अंदाज आहे. कलिंगड फळाचे वजन चक्क ७ किलो भरत आहे. वाशी – नवी मुंबई बाजारपेठेत पहिल्या तोडणीतील कलिंगडास प्रतिकिलोस सुमारे ९ रुपये दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात ऊस पिकामध्ये त्यांनी कलिंगडाची रोपे लावली. वेळोवेळी कीड व रोग नियंत्रणासाठी औषध फवारणी, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागतीची कामे केली. या पिकासाठी पिकासाठी किशोर घोगरे, पृथ्वीराज मोरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.