जालना : खडकपूर्णा ॲग्रो लि. संचलित सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना व पैनगंगा या दोन कारखान्यांच्या थकीत ऊस बिल प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १२ एप्रिलपासून प्रादेशिक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देऊन आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर लगेच कारखाना शेतकऱ्यांचे पैसे लवकरच खात्यावर वर्ग करील असे लेखी आश्वासन कारखान्याच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परतूर व मंठा तालुक्यातील ऊस या कारखान्यांना गाळपास पाठविण्यात आला होता. मात्र, या कारखान्यांनी पैसे देण्यास उशीर केल्याने शेतकरी संतापले आहेत. तीन महिने उलटूनही कारखान्यांनी पेमेंट केलेले नाही. शेतकऱ्यांनी फोन करून विचारणा केल्यावर कारखाना प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत होते. याप्रश्नी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. शेतकऱ्यास साखर उताऱ्याप्रमाणे २८०० ते ३००० रुपये दर तत्काळ देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा प्रादेशिक कार्यालयामध्ये १२ एप्रिलपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर साखर कारखाना संचालकांनी ३० एप्रिलपर्यंत पैसे देण्याचे दिले. संघटनेचे तुकाराम धुमाळ, बाबासाहेब पवार, सखाराम धुमाळ, बळीराम चव्हाण, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष धुमाळ, बद्री धुमाळ, भागवत बोरकर, तुकाराम शिंगणे आदी उपस्थित होते.