नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून मक्याच्या लागवडीला केंद्राने प्रोत्साहन दिले. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत केंद्राने मक्याच्या वापराला प्राधान्य दिल्यानंतर मक्याला इथेनॉल उद्योगातून मागणी वाढू लागली. त्यामुळे गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा इथेनॉल कंपन्यांना मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचा सर्वाधिक पुरवठा होत आहे. यंदा फेब्रुवारीअखेर विविध घटकांपासून उत्पादित २७८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला आहे. यामध्ये मक्याचा वाटा ११९ कोटी लिटरचा आहे.
स्टार्च व पशुखाद्य उद्योगासाठी ही मक्याला नियमित मागणी असते. सध्या एकूण मागणीच्या तुलनेत मक्याचे पीक फारसे नाही. यापूर्वी इथेनॉल उत्पादनाचा सगळा भार साखर उद्योगावर होता. २०२१-२२ पर्यंत तेल कंपन्यांना मक्याइपासून तयार झालेले इथेनॉल मिळत नव्हते. आता चित्र बदलले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाचा रस, साखरेच्या सिरपपासून ११६ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहे. बी हेवी मोलॅसिसपासून २१ कोटी, खराब धान्यापासून १८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. अनुदानित तांदळापासून अजूनही इथेनॉलची निर्मिती झाली नसल्याचे चित्र आहे.