पुणे : ‘दि फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एफएआय) मळी आधारित खत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या २८ रोजी पुण्याच्या दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्से असोसिएशनमध्ये (डीएसटीए) होणाऱ्या सकाळी ९ ते ५ या वेळेत होत असलेल्या या चर्चासत्रात खत उद्योगातील निर्माते, विपणन क्षेत्रातील प्रतिनिधी, आयातदार व निर्यातदार, वितरक, संशोधन, धोरणकर्ते सहभागी होत आहेत. साखर उद्योगात मुबलक प्रमाणात मळी उपलब्ध होते. मात्र, मळीपासून पालाश खताची निर्मितीची क्षमता अद्यापही पूर्ण वापरली गेलेली नाही. त्यामुळे मळीतील पालाश निर्मितीला चालना देण्यासाठी खत उद्योगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
‘एफएआय’चे प्रांतिक कार्यकारी अधिकारी एस. पी. शेटे यांच्याकडून सध्या या चर्चासत्राची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. चर्चासत्रात राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, एफएआयचे संचालक (विपणन) नरेश प्रसाद, आर. के. अॅग्रोचे संचालक प्रकाश कारखेले, राघवेंद्र फर्टिलायझर्सचे अध्यक्ष नरेंद्र पंडितराव, मालती फाइन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोहन डोंगरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, वासुमित्र लाइफ एनर्जीच्या संचालिका डॉ. हेमांगी जांभेकर व मुंबईतील प्रादेशिक खत नियंत्रण प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. सी. एम. माथवन सहभागी होत आहेत. चर्चासत्रात स्पेन्टवॉशपासून खताची निर्मिती, पालाशयुक्त खते आणि खतांच्या संशोधनाची वाटचाल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मते मांडली जाणार आहेत.