पुणे : पुण्यात साखर संग्रहालय निर्मितीचा प्रस्ताव साखर आयुक्तांनी राज्य सरकारला पाठविला आहे. या संग्रहालयात साखरेचे उत्पादन करणाऱ्या यंत्रसामुग्रीचे मीनी मॉडेल, राज्य आणि देशातील साखर उत्पादनाचा इतिहास यांचा समावेश असेल. याशिवाय कॅफेटेरिया, बहुउद्दीशीय हॉल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.
सद्यस्थितीत बर्लिन, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियात अशा प्रकारची संग्रहालये आहेत. साखर आयुक्त कार्यालयासमोरील पाच एकर जमिनीवर या म्युझियमचा प्रस्ताव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सहकार, पणन आणि वस्रोद्योग मंत्रालयाच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे.
टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, पुणे जिल्हा राज्यातील ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात १६ सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. पुण्यात संशोधन केंद्र आणि संस्थाही आहेत. उसाच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. याशिवाय, साखर उद्योगाला नव तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्याचे कामही संस्थेतर्फे केले जाते. याशिवाय ऊस उत्पादन तंत्रात राज्याचा इतिहास आणि विकासात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या सर्वांची माहिती एकत्रित संग्रहित करण्यासाठी संग्रहालयाची गरज असल्याचे गायकवाड यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. साखर उद्योगासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, त्यांच्याबद्दलही गायकवाड यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे. संग्रहालयासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार असून यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. संग्रहालयाच्या डिझाइनसाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली जाईल. संग्रहालयाच्या देखभालीसाठी प्रवेश शुल्कासह साखरेच्या रिकव्हरी फंडातून तरतुद करण्याची संकल्पना आहे.