सोलापूर : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. कारखाना प्रशासनातर्फे राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारी ही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. आजपर्यंत सहकारी साखर कारखान्यामार्फत राज्यामध्ये चांगले प्रकल्प हाती घेवून राज्याच्या विकासामध्ये सहकारी साखर कारखान्याचा सिंहाचा वाटा आहे. सहकारी साखर कारखान्यावर पदसिध्द अधिकारी म्हणून कार्यकारी संचालक हे शासनाच्या वतीने प्रतिनिधीत्व करीत आहेत. सहकार क्षेत्रामध्ये कार्यकारी संचालक हे पद अत्यंत महत्वाचे मानले जाते.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, दि.०२.०१.२०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील राजाराम सहकारी साखर कारखाना लि. (कसबा बावडा) येथील कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना रस्त्यामध्ये गाडी अडवून समाज कंटकांनी मारहाण केली. या घटनेचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा प्र.कार्यकारी संचालक या नात्याने जाहिर निषेध करतो. ही घटना गांभिर्याने न घेतल्यास इतर कारखान्यातील कार्यकारी संचालकांवरही असा प्रसंग ओढावू शकतो. तरी या घटनेचा निषेध नोंदवून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक यांनी केली आहे.