डेहराडून : संयुक्त शेतकरी आघाडीशी संलग्न शेतकऱ्यांनी गळीत हंगाम सुरू होण्याआधी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ केली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. संयुक्त शेतकरी आघाडीच्या आवाहनानंतर शेतकरी साखर कारखान्याच्या गेटसमोर एकत्र आले. त्यांच्याशी संवाद साधताना आघाडीचे अध्यक्ष ताजेंद्र सिंह यांनी सांगितले की, उत्पादन खर्चाच्या प्रमाणात ऊस दर मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. सरकारने या सर्व समस्यांकडे काणाडोळा केला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दलजित सिंह यांनी सांगितले की, महागाईच्या प्रमाणात ऊस दरात वाढ करण्याची गरज आहे. राज्य सरकारने गळीत हंगामापूर्वी ऊस दर जाहीर केला पाहिजे असे भाकियू टिकैत गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह खालसा यांनी सांगितले. ऊस समितीचे अध्यक्ष मनोज नौटियाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखून संघर्ष करण्याची गरज आहे. ऊस शेतीसाठी आवश्यक बियाणे, कामगारांची मजुरी, किटकनाशके, खते आदींच्या किमतीत सतत वाढ होत असल्याचे शेतकरी गुरदीप सिंह यांनी सांगितले. त्यामुळे ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सुरेंद्र राणा, गुरदीप सिंह, ओंकार सिंह राजा, अश्वनी त्यागी, गुरुपाल सिंह आदी उपस्थित होते.