कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) साखर कामगार संघाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता ‘गोडसाखर’च्या गेटसमोर आंदोलन केले. येथील शिल्लक साखरेचा साठा कामगारांशी चर्चा केल्याशिवाय गेटबाहेर सोडू नये, अशा आशयाचे निवेदनही दिले. यापूर्वी या विषयावरून कामगारांनी प्रॉव्हिडंड फंड कार्यालयाला निवेदन देत १६ कोटी २२ लाख १२ हजार ९१३ रुपये कारखान्याकडून भरून घ्यावी, अशी मागणी केली होती.
२०१३ पासून कारखान्याने कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड व व्याजही भरलेले नाही. ही सर्व रक्कम १६ कोटी रुपये आहे. ‘गोडसाखर’ने उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण बिले व तोडणी वाहतुकीची सर्व बिले कारखान्याने दिली आहेत. कारखान्याकडे १ लाख ७० हजार क्विंटल साखरेचा साठा शिल्लक आहे. हा साखर साठा विक्री करून कामगारांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली. याबाबत सुरक्षारक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व कामगार उपस्थित होते.