सांगली : चीनी मंडी
उसाची एफआरपी तुकड्यांमध्ये न स्वीकारण्यावर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (२८ जानेवारी) पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘राज्यात साखर करखाने सुरू होऊन जवळपास अडीच महिने झाले आहेत. तरी, कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही. आम्हाला तुकड्यात मिळणारी एफआरपी मान्य नाही. येत्या सोमवारी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जोपर्यंत एफआरपीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.’
उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी गेले पंधरा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘राज्यात सध्या ५ हजार ५०० कोटींची एफआरपी थकीत आहे. उत्तर प्रदेशात ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. केंद्र सरकार एफआरपीच्या मुद्द्यावर निर्णय घेताना दिसत नाही. त्याउलट शेतकऱ्यांची फसवणूकच सुरू आहे. आर्थिक स्थिती नसल्याचे कारण सांगणाऱ्या कारखान्यांवर सरकारने दबाव टाकण्याची गरज होती.’
खोटं बोला पण रेटून बोला अशी पंतप्रधानांची स्थिती आहे, अशी टिका खासदार शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील भाजपच्या बूथ कमिटीतील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. एफआरपी दिल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पण, ही माहिती २०१५-१६च्या हंगामाची आहे. २०१७ पासून कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही.’
राज्यात सुमारे १८० साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी ११ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी अद्यापही एकरकमी एफआरपी दिलेली नाही, अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. आधी एफआरपीचा प्रश्न सोडवू नंतर लोकसभा निवडणुकीतील आघाडीचा विचार करू, असेही खासदार शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘सहकारमंत्रीच थकबाकीदार’
उत्तर प्रदेशमध्ये थकबाकीदार साखर कारखान्यांच्या दोन कार्यकारी संचालकांना नोटीस देऊन अटक केल्याचा संदर्भ खासदार शेट्टी यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले,‘महाराष्ट्रातही कारखान्यांची थकबाकी मोठी आहे. इथे राज्याचे सहकारमंत्रीच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार? ’
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp