ऊस तोड कामगारांना अत्यावश्यक सेवा ताडडीने पुरवाव्यात: जिल्हाधिकारी

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच या कामगारांना साखर कारखान्यांनी जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक सेवा द्याव्यात, असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमा रोखल्या असून प्रवासी व माल वाहतूक बंद केली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. ‘कोरोना’ च्या भितीने ऊसतोड मजूर गावांकडे परतू लागले आहेत. ऊसतोड मजूर थांबत नसल्यामुळे काहींनी हंगाम आटोपता घेतला आहे. हे ऊसतोड मजूर राज्य तसेच जिल्ह्या बाहेरून आले आहेत. ते घराकडे परतण्यासाठी
वेगवेगळ्या वाहनांतून जात आहेत. काही ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत.

याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. ऊसतोड मजुरांच्या निवासाची सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी सोय करावी. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाव्यात अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी दिल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here