कोल्हापूर : गवसे येथील वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याने येत्या हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑक्टोबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने मशिनरींच्या ओव्हरहॉलिंगची कामे अतिशय गतीने सुरू आहेत. हंगामासाठी ८ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. उपाध्यक्ष मधुकर देसाई यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष धुरे यांनी सांगितले की, मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ३० सप्टेंबरपूर्वी ओव्हरहॉलिंगची कामे पूर्ण करून कारखाना गळितासाठी सज्ज ठेवणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामासाठी ३५० बीड व परिसरातील तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्याने सज्ज ठेवली आहे. जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दीपक देसाई, रणजित देसाई, प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेजर (टेक्नि.) संभाजी सावंत, चिफ इंजिनिअर सुरेश शिंगटे आदी उपस्थित होते.