जालना : धारूर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि.३) सुरू झाली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऊसाच्या फडात जाऊन मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस दिला. आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर यांनी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वाडी, वस्ती, गाव, तांडे, उसाचे फड, बस स्थानक अन् रस्त्यावर दिवसभर उभे राहुन बालकांना डोस दिले.
धारूर शहरात १२ बूथ तर ग्रामीण भागात १०७ बुथवर लसीकरण करण्यात आले. तसेच फिरते पथक द्वारे लसीकरण मोहीम राबवण्यात आली. धारूर शहरात पाच वर्षाखालील २ हजार १४५ तर ग्रामीण भागात ८ हजार १५४ एवढे बालक ५ वर्षाखालील असून यातील ८० ते ९० टक्के बालकांचे लसीकरण झाले. शासन बालकांना अपंगत्व येऊ नये यावर मात करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.