पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. ४) शिरोली बुद्रुक व ओबीसी गट वगळता इतर गट बिनविरोध झाले आहेत. शिरोली बुद्रुक गटामध्ये तीन जागांसाठी चार अर्ज शिल्लक असून, ओबीसी गटाच्या एका जागेसाठी तीन अर्ज राहिल्याने या गटात निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान ४ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. घोडेगाव गटामध्ये तीन जागांसाठी तीनच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या गटातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. जुन्नर गटामध्ये देखील तीन जागांसाठी तीनच अर्ज आल्याने हा गट देखील बिनविरोध झाला आहे. ओतूर गटामध्ये चार जागांसाठी चार अर्ज शिल्लक राहिल्याने हा गट देखील बिनविरोध झाला असून, पिंपळवंडी गटात देखील तीन जागांसाठी तीनच अर्ज आल्याने हा गट देखील बिनविरोध झाला आहे.
अनुसूचित जाती-जमाती गटामधून एकच अर्ज तसेच महिला राखीव गटामधून दोन जागांसाठी दोनच अर्ज आणि भटक्या विमुक्त जमाती या गटासाठी एकच जागा असून, येथे देखील एकच अर्ज शिल्लक राहिल्याने हा गट देखील बिनविरोध झाला आहे. शिरोली बुद्रुक गटामध्ये सत्यशील शेरकर, सुधीर खोकराळ, संतोष खैरे व इनामदार रहमान अब्बास मोमीन हे चार अर्ज राहिल्याने या गटामध्ये निवडणूक होणार आहे. तसेच इतर मागासवगीय गटांमध्ये एका जागेसाठी इनामदार रहमान अब्बास मोमीन, सुरेश गडगे, नीलेश भुजबळ हे तीन अर्ज शिल्लक राहिल्याने या गटात देखील निवडणूक होणार आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनेने आपल्या सर्व उमेदवारांची माघार घेऊन सत्यशील शेरकर यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ यांनी सांगितले. सत्यशील शेरकर यांच्या गटाच्या १७ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक
■ जुन्नर गट- देवेंद्र खिलारी, अशोक घोलप आणि अविनाश पुंडे.
■ ओतूर गट- बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, पंकज वामन आणि रामदास वेठेकर.
■ घोडेगाव गट- यशराज काळे, दत्तात्रय थोरात आणि नामदेव थोरात.
■ अनुसूचित जाती जमाती गट- प्रकाश सरोदे.
■ महिला राखीव गट पल्लवी डोके आणि नीलम तांबे.
■ भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास गट संजय खेडकर.