पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २२६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात शेवटच्या दिवशी तब्बल ९६ अर्ज भरले गेले. मावळ तालुक्यातील सोमाटणे- पवनानगर गटात सर्वाधिक ४१ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. या कारखान्याचे मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली या पाच तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली.
मुळशी तालुक्यातील हिंजवडी ताथवडे गटातून तीन जागांसाठी १८ अर्ज आले. पौड- पिरंगुट गटातून तीन जागांसाठी २३ जणांनी अर्ज भरले. मावळ तालुक्यातील तळेगाव – बडगाव गटात तीन जागेसाठी २९ जण इच्छुक आहेत. तर, सोमाटणे- पवनानगर गटातील तीन जागेसाठी सर्वाधिक ४१ उमेदवारी अर्ज भरले गेलेत. खेड-हवेली – शिरुर गटात चार जागांसाठी ३७अर्ज आलेत. महिलांच्या राखीव दोन जागेसाठी २३ अर्ज भरले गेले. अनुसुचित जाती/जमातीच्या एका जागेसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले. इतर मागासवर्गीय गटातही एका जागेसाठी ३७; तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी नऊ जणांनी अर्ज भरले. उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (ता. १०) होणार आहे. पुणे शहर सहकारी संस्थेचे उपनिबंधक मुकुंद पवार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे.