पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये काही उमेदवारांचे दोन अर्ज असल्याने त्यामधील एक अर्ज माघार झाल्यास त्या ठिकाणच्या जागाही बिनविरोधच होतील. या कारखान्यावर स्थापनेपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची एकहाती सत्ता आहे. यंदाही निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा हर्षवर्धन पाटील यांचेच वर्चस्व कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
कारखान्याच्या २०२४- २५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळ निवडणुकीकरिता सोमवारी (ता. २४) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. यात २१ जागांसाठी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, कृष्णाजी यादव या दिग्गजांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी जागांइतकेच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. बावडा गटातील तीन जागांसाठी सर्वाधिक सात अर्ज दाखल झाले आहेत.