पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मुळशी तालुक्यातून एकूण ५७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पौड-पिरंगुट, हिंजवडी ताथवडे गटासह इतर प्रवर्गातील जागांसाठीच्या अर्जाचा यात समावेश आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत नुकतीच वाकड येथे बैठक झाली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शनिवारी (दि. २२) वाकड येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात सर्व इच्छूक उमेदवारांची बैठक होणार आहे. बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
पौड- पिरंगुट या गटातून ज्येष्ठ नेते राजेंद्र हगवणे, महादेव कोंढरे, स्वाती ढमाले, सारिका ठोंबरे, लक्ष्मण भरेकर, धैर्यशील ढमाले पुन्हा इच्छुक आहेत. दिलीप दगडे, अंकुश उभे, महादेव दुडे यांनीही उमेदवारी मागितली आहे. यशवंत गायकवाड, अनिकेत रानवडे, सुभाष टेमघरे, राजेंद्र कुदळे, लहू फाले, शरद ववले, नथोबा मारणे, दत्तात्रेय उभे, विदुरा नवले, चेतन भुजबळ, तुकाराम विनोदे, वसंत साखरे, पांडुरंग राक्षे, सुनील ढवळे, तुकाराम जाधव, यशवंत साखरे, दत्तात्रेय जाधव, संभाजी हुलावळे, मोहन भूमकर, बाळू भिंताडे, धनंजय जाधव, मोहन कस्पटे, युवराज कलाटे, हनुमंत भिंताडे, संभाजी गायकवाड आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. महिला राखीव गटात दोन जागांसाठी कारखाना कार्यक्षेत्रातून वीस अर्ज आलेत. तर अनुसूचित जाती जमाती गटात एका जागेसाठी आठ अर्ज आले आहेत.