पुणे : यशवंत साखर कारखान्याची ९९ एकर जमीन बाजार समितीकडे; संयुक्त बैठकीत निर्णय

पुणे : थेऊर येथील यशवंत साखर कारखान्याची अतिरिक्त ९९.२७ एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला २९९ कोटी रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजार समितीचे संचालक मंडळ आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची संयुक्त बैठक शुक्रवारी पार पडली.या बैठकीत एकमताने अतिरिक्त जमीन बाजार समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यशवंत साखर कारखान्याच्या जमिनीचे बाजार मूल्य (रेडीरेकनर)अंदाजे ३३५ कोटी रुपये आहे. उपबाजार निर्मितीसाठी यशवंत साखर कारखान्याची अतिरिक्त जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन(विकास व विनयमन) अधिनियम १९६३ मधील कलम १२ (१) नुसार मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये पणन संचालनालयास दिलेला होता.त्यानंतर पणन संचालकांनी कारखान्याची जमीन विक्रीसाठी सर्वसाधारण सभा घेणे, साखर आयुक्तांची परवानगी, तसेच जमीन खरेदीच्या दराबाबत त्रुटी काढली होती.त्यानुसार सर्वसाधारण सभेत जमीन विक्रीचा ठराव मांडण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी (२८ मार्च) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात दोन्ही संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, बाजार समितीचे सचिव डाॅ. राजाराम धोंडकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. या बैठकीत जमीन विक्री आणि खरेदीचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

शेतकरी तसेच बाजार घटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून हवेली तालुक्यातील मौजे कोरेगांव मूळ येथील १२ एकर जमीन ५३ कोटी १७ लाख ८८ हजार ७०४ रुपयांना ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी (ग्रामीण) ५ जुलै २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये कोरेगाव मूळ येथील जागा दुय्यम उपबाजार आवार घोषित केला आहे. थेऊरमघील जागा खरेदीसाठी निधी उपलब्धता व्हावी म्हणून कोरेगाव मूळ येथील उपबाजाराच्या जागेचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. पणन संचालकांची कलम १२ (१) अन्वये परवानगी घेऊन विक्री करणे आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याबाबतचा निर्णय बाजार समितीने घेतल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले की, बाजार समितीने २७५ कोटी रुपयांना यशवंत सहकारी कारखान्याची जमीन घेण्याचा प्रस्ताव कारखान्याच्या संचालक मंडळाला दिला होता. ही जागा ३२५ कोटी रुपयांना खरेदी करावी, असा प्रस्ताव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मांडला होता. बाजार समिती आणि कारखान्याच्या संचालक मंडळाची संयुक्त बैठक पार पडली. यशवंत साखर कारखान्याची जमीन २९९ कोटी रुपयांना बाजार समितीला देण्याचे निश्चित करण्यात आले. अन्य शासकीय परवानग्या घेऊन ही जागा खरेदी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here