पुणे : पुरंदर तालुक्यातील मांडकी युवा शेतकरी सचिन गायकवाड यांनी १०७ टन उसाचे उत्पादन घेत उच्चांक प्रस्थापित केला आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद गायकवाड यांनी चालू हंगामामध्ये एकरी १०७ टन उत्पन्न घेतले. कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी ही माहिती दिली. तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढत आहेत. यापूर्वी मांडकीतील प्रयोगशील शेतकरी दीपक सावंत व जयंत सावंत या बंधूंनी एकरी १०२ टन उसाचे उत्पादन घेतले होते. तसेच प्रयोगशील शेतकरी मानसिंग जगताप यांनी एकरी १०६ टन उसाचे उत्पादन घेतले आहे असेही संचालक जगताप यांनी सांगितले.
याबाबत सचिन गायकवाड यांनी सांगितले की, ऊस पिकासाठी आधी शेतात शेणखताचा वापर केला. को-८६०३२ उसाच्या रोपाची लागवड दोन फूट अंतरावर केली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेणखत, गांडूळखत, जीवामृत, डी. कंपोजर आणि रासायनिक खतांचा वापर केला. मोठ्या बांधणीला रासायनिक खत व कोंबड खत टाकले होते. बांधणीनंतर दोन महिन्यांनंतर एक खताचा डोस देत पाचट काढले. वीर येथील सचिन बनकर यांनी खतांचे मार्गदर्शन केले. ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत रासायनिक खतांचा एकरी खर्च पंचवीस हजार आला. रोपे, नांगरणी, सरी, लागवड इतर खर्च तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी झाला आहे. एकूण एकरी खर्च साठ हजार रुपये झाला. काढणीस आलेल्या एका उसाच्या टिपऱ्या ४६ ते ४८ इतक्या होत्या. एका उसाचे वजन साडेतीन ते चार किलोदरम्यान होते, असे गायकवाड म्हणाले.