पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २६ फेब्रुवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर दुपारी दिड वाजता होणार आहे. कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यासंदर्भातील मुख्य विषय या सभेच्या अजेंड्यावर आहे. याशिवाय विविध विषयांवर चर्चेसाठी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी केले आहे.
सभेत कारखान्याचा जुन्या यंत्रसामुग्री बाबत व नवीन आधुनिक साखर प्लांट, आसवनी प्लांट व को-जनरेशन प्लांट उभारणीस संचालक मंडळाला परवानगी देणे, संस्थेच्या नावात बदलाचा संचालक मंडळाने मांडलेल्या प्रस्तावास मान्यता देऊन, त्यास शासन मान्यता घेणे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अनुसार सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाची दर्शनी किमंत १५ हजार प्रमाणे झाल्याची अंमलबजावणी करण्याची नोंद घेणे आदी विषयांवर चर्चा होईल. गेली १३ वर्षे बंद असलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी भांडवल उभारणी, बँकांची कर्जे, शेतकऱ्यांची थकीत ऊसबीलं, कामगारांचे थकीत पगार, शासकीय देणी, व्यापारी देणी व इतर देणी द्यायची आहेत. तसेच इतर विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.