पुणे : जिल्ह्यातील ऊस गाळपात बारामती ॲग्रो साखर कारखाना आघाडीवर

पुणे : जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या ऊस गाळपात ‘बारामती ॲग्रो’ साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याने केले १० लाख २७ हजार ४३७ टन उस गाळप केला असून त्यातून ७ लाख ५९ हजार ६७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर साखर उतारा सरासरी ७.३१ टक्के एवढा आहे. जिल्ह्याचा साखर उतारा सरासरी ८.६५ टक्के एवढा आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा १०.९१ टक्के एवढा साखर उतारा असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सध्या सुरू झालेल्या कारखान्यामध्ये सहकारी ९ व खासगी ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १७ हजार टन एवढी आहे. आत्तापर्यंत सुरू झालेल्या १४ कारखान्यांनी ५२ लाख ४७ हजार ३५५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४५ लाख ३७ हजार १२९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू वर्षी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे.

मध्यंतरी ढगाळ वातावरण व पावसामुळे कारखाने काही प्रमाणात गती मंदावली होती. परंतु पुन्हा वेग आला आहे. जुलैपासून शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील पूर्व व उत्तर भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दीड लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा: पुणे : विघ्नहर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, २२ हजार सभासदांची यादी प्रसिद्ध

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here