पुणे : जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान हे अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीत सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार गट) प्रवेश करत निवडणूक लढविली. मात्र त्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पारंपरिक मतदारसंघ म्हणून शड्डु ठोकत, शेरकर यांच्या उमेदवारी समोर आव्हान उभे केले होते. मात्र महाविकास आघाडीने ‘तडजोड’ करत विघ्नहरच्या संचालक मंडळामध्ये मानाचे पान दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला कारखान्यात कमाल जागा मिळणार का याची उत्सुकता आहे.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दोन निवडणुकांमध्ये सत्यशील शेरकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांचा हिरिरीने प्रचार केला होता. मात्र तरीही आढळराव यांनी ‘विघ्नहर’च्या कामकाजाचे कौतुक करत, शेरकर यांना पाठिंबा दिला. आढळराव पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सक्रिय आहेत. आता कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मानाचे पान देत समन्वय साधला जाणार का, याकडे तालुक्यातील सभासदांचे लक्ष वेधले गेले आहे. विधानसभा निवडणुकीत सत्यशील शेरकर यांचा पराभव होऊन अनपेक्षितरीत्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) बंडखोर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजयी झाले. तसेच आमदार अतुल बेनके यांचा पराभव झाला. या विधानसभा निवडणुकांचे पडसाद ‘विघ्नहर’ निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.