पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम घोगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नीरा भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. सलग पाचव्यांदा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणारा नीरा भीमा हा राज्यामध्ये एकमेव कारखाना आहे.

नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर शहाजी सभागृहामध्ये संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी भाग्यश्री पाटील व उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब घोगरे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी केली. भाग्यश्री पाटील या कारखान्याच्या संचालिका म्हणून गेली २० वर्षे काम करीत आहेत. तसेच, त्या अनेक सहकारी संस्थांवर संचालिका म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा इंदापूर तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात गेली ३ दशके सक्रिय सहभाग राहिला आहे.

या निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यश्री पाटील व दादासाहेब घोगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंकिता पाटील-ठाकरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी देवकर, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे आदी संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी आभार मानले.

‘नीरा भीमा’च्या स्थापनेपासून गेली २६ वर्षे झाले कारखान्यावरती शेतकरी सभासदांचा मोठा विश्वास कायम आहे. या विश्वासाच्या शिदोरीवरच कारखान्याने आजपर्यंतच्या प्रगतीचा मोठा टप्पा गाठलेला आहे. गत हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट येत्या काही दिवसात अदा केले जाईल. आगामी ५ वर्षांमध्ये कारखान्याची स्थिती कठोर निर्णय व नियोजन करून पूर्वपदावर आणावयाची आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी होईल, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here