पुणे : दौंड शुगरने चालू गळीत हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रती टन २८०० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील एका कार्यक्रमात याची घोषणा केली होती. कारखान्याने २६०० पहिला हप्ता जमा केल्याबद्दल एका शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत कारखान्याने २०० रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता दौंड शुगर कारखान्याने २८०० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला आहे. दरम्यान, तालुक्यातील तिन्ही कारखान्यांमध्ये साखरेबरोबर आसवानी, सहवीजनिर्मिती यांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कारखान्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत न पाहता प्रतिटन ३००० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता द्यावा अशी मागणी दौंड बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रेय पाचपुते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, पाटस (ता. दौंड) येथील एमआरएन भीमा पाटस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याने सन २०२४-२५ या गळीत हंगामामध्ये उसाला प्रतिटन २८०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. कारखाना सुरू होऊन दोन महिने उलटले तरी दर जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. भीमा कारखान्याने ६० दिवसात ४ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करत ३ लाख ९४ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. साखर उतारा १०.८८ टक्के आहे. विस्तारीकरणानंतर दररोज सुमारे आठ हजार टन उसाचे गाळप केले जात आहे. तालुक्यातील तीन कारखान्यांनी आतापर्यंत एकूण १८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. दौंड शुगरने आतापर्यंत दहा लाख ६० हजार, भीमा शुगरने ४ लाख ४० हजार, तर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. तालुक्यातील अनुराज हा कारखाना बंद आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.