पुणे – भीमाशंकर कारखाना लवकरच २८० रुपये प्रती टन दुसरा हप्ता देणार

पुणे : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये उसाला एफआरपीनुसार २,८०० रुपये प्रती टन पहिली उचल दिली आहे. उच्च न्यायालय व नव्या शासन निर्णयानुसार गतहंगामासाठी ११.८१ टक्के उतारा गृहीत धरून एकूण एफआरपी ३०८० रुपये येत आहे. यापूर्वी २८०० रुपये टन उचल अदा केलेली आहे. आता २८० रुपये टन फरक देत आहोत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. मंचर येथे रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, संचालक बाळासाहेब घुले, दादाभाऊ पोखरकर, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाघचौरे उपस्थित होते. १० मेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जातील असे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष बेंडे म्हणाले की, कारखान्याने गाळप केलेल्या ११ लाख ३८ हजार ४९६ टन उसाला ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील. कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी संचालक मंडळ बैठकीत एफआरपीनुसार उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झालेला आहे. आधी १२ टक्के उताऱ्यानुसार, ३१०० रुपये प्रती टन निश्चित केले होते. मात्र, उतारा घटल्याने यात फरक येत आहे. यापूर्वी देखील प्रत्येक हंगामाची एफआरपी नुसार येणारी फरकाची रक्कम हंगाम संपल्यानंतर अदा केलेली आहे. हंगामात कारखान्याने १२ लाख ५२ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन केले असून सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे सात कोटी ३३ लाख सहा हजार युनिट उत्पादन केले आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here