पुणे : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार, महिला, गरोदर महिला, स्तनदा माता व बालकांसाठी आरोग्य शिबिर झाले. यावेळी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव पंचायत समिती, शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आरोग्य शिबिराचा लाभ १३४ महिला, पुरुषांनी घेतला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.
शिबिरात महिला मजुरांना आरोग्याचे व स्वच्छतेच्या दृष्टीने माहिती दिली असून, सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले आहे. ऊस तोड, वाहतूक कामगार, महिलांची तपासणी करून त्यांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. गरोदर महिला, स्तनदा माता व बालकांची तपासणी करून मोफत लसीकरण करण्यात आले. वाहतूक कामगार महिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन मोफत तपासणीकरिता पाठवले आहेत. शिंगवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुबिना शेख, शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मैड यांनी रुग्णांची तपासणी केली.