पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. जाचक यांच्या सर्वपक्षीय मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावून जाचक यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मात्र आता जागा वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या गटामध्ये जागा वाटपावर एकमत झाले नसल्याने युती फिस्कटली. येत्या २४ तासांमध्ये पॅनेलमधील जागेवर एकमत न झाल्यास जाचक गटाकडून स्वतंत्र पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र, सर्वपक्षीय पॅनेलची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. उमेदवारीसाठी अनेक बैठकाही पार पडल्या. पवार जाचक गटामध्ये उमेदवारीच्या नावावरून एकमत होत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जाचक यांनी मंगळवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यामुळे येत्या एक – दोन दिवसांत स्वतंत्र उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.