पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील वृंदावन पॅलेस येथे बुधवारी यशवंत साखर कारखान्याच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्रीच्या विषयावरून गोंधळ उडाला. पंधरा वर्षांनी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत कारखान्याची ९९.२७ एकर जमीन विक्री, नफातोटा व ताळेबंद, भागभाडवली उभारणीस मान्यता देणे, कारखान्याचा ड्यु-डिजीलन्स अहवालावर चर्चा करणे, नाववदलास मान्यता देणे, आदी विषय चर्चेसाठी ठेवले होते. मात्र, पहिल्याच विषयावरून विरोधकांनी सत्तारूढ आघाडीला धारेवर धरले. त्यामुळे संचालक मंडळाने अचानक सर्व विषयांचे वाचन करत मंजूर, मंजूरच्या घोषणांत सर्व अकरा विषय कुठल्याही चर्चेशिवाय दहा मिनिटांत मंजूर केले.
सभेत पांडुरंग काळे यांनी मागील इतिवृत्तांत नुसार सभासदांची देणी कारखान्याने का दिली नाही? याबाबत संचालक मंडळांना विचारणा केली. याचवेळी संचालक मोरेश्वर काळे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचले आणि सभेस ठराव मंजूर आहे का? असे आवाहन केले. यावर गोंधळातच अनेक सभासदांनी मंजूर, मंजूर अशा घोषणा दिल्या. त्यामुळे दहाच मिनिटात सभेचा गाशा गुंडाळण्यात आला. उपाध्यक्ष किशोर उंद्रे, कार्यकारी संचालक कैलास जरे, संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. संचालक मंडळाने म्हणणे ऐकूनही न घेता मनमानी कारभार केल्याचा आरोप सभासदांनी केला. सभासदांचे मत विचारात घ्या, जमीन विकून मिळणाऱ्या पैशाचे करणार काय? असे सवाल विचारत निषेध केला.