पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरावरून गोंधळ

पुणे : न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या वेळेस मोठा गोंधळ झाला. सभेतील सर्व विषय मंजूर झाल्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी सांगितले. तर सत्ताधाऱ्यांनी गोंधळातच सभा गुंडाळली असल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केला. दोन्ही बाजूने परस्परांविरोधात घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणीच प्रतिसभा घेण्यात आल्या. घोडगंगा कारखान्याचे कर्ज एनपीएमध्ये नसताना राजकीय सुडाने शासनाने कर्ज नाकारल्याचा आरोप अध्यक्ष पवार यांनी केला. तर आमदार अशोक पवार यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच कारखाना बंद पडला आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ यांनी स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील हे विषयपत्रिका वाचत असतानाच काही सभासदांनी घोषणाबाजी केली.
अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी कारखान्याला ‘एनसीडीसी’चे कर्ज मिळावे यासाठी उच्च न्यायालय निश्चित न्याय देईल आणि कारखाना परत सुरू होईल. यावर माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी माईकचा ताबा घेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, असा आग्रह केला. आमदार अशोक पवार यांनी माइकचा ताबा घेत अध्यक्ष सर्व प्रश्नांना उत्तरे देतील, गोंधळ घालू नका, असे सांगितले. या वेळी आमदार अशोक पवार व दादा पाटील फराटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूने गोंधळ झाला. यावेळी सभासदांनी सर्व विषयाला मंजुरी दिल्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी सांगितले. सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी झाली. सभेचे कामकाज संपल्यावर दोन्ही बाजूने घोषणाबाजी करून सभेच्या ठिकाणी सत्ताधारी व विरोधकांनी प्रती सभा घेतल्या. अशोक पवार खोटे बोलत असल्याचा आरोप रवींद्र काळे, महेश ढमढेरे, सुधीर फराटे, राहुल पाचर्णे आदींनी केला. तर केवळ मी शरद पवार गटात असल्याने काही नेत्यांनी जाणीवपूर्वक राजकारण केले असा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here