पुणे : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन ४० ते ४५ दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत पहिला हप्ता देणे बंधनकारक असतानाही कारखानदारांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी ऊसदराची कोंडी फोडावी; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरसिंह कदम यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामती येथील प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला असूनही कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी पैसे अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांना कर्जाचे नवे-जुने करता आलेले नाही. तसेच उधारीवर घेतलेल्या खतांचे पैसे देता आलेले नाहीत, , याबरोबरच दवाखाना, मुलांची लग्नकार्ये, शैक्षणिक खर्च, शेतीमशागतीसाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांना सूचना करून उसाचा पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये जाहीर करून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा; अन्यथा संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल. यावेळी बाबासाहेब झगडे, नितीन घोळवे, राहुल घोळवे, रामदास शिंदे, औदुंबर आव्हाड, सागर घोळवे, दत्तात्रय गायकवाड, संतोष घोळवे, संदीप सपकळ आदी उपस्थित होते.