पुणे :सोमेश्वर साखर कारखान्याने मागील गळीत हंगामातील खोडकी बिल २०० रुपये प्रती टनानुसार द्यावे,अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे. कारखान्याला जास्तीचे गाळप, चांगली रिकव्हरी, को-जन व उपपदार्थांचे तसेच प्रकल्पांमधूनही अतिरिक्त उत्पन्न मिळाले असताना कारखान्याने शेतकऱ्यांना जादा पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शेजारील माळेगाव कारखान्याने २०० रुपये कांडे बिल सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहे,असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कारखान्यने गाळप हंगामात १७६ दिवसांमध्ये ११.९८ रिकव्हरीने विक्रमी १५ लाख २३ हजार ८७६ टन गाळप केले आहे.कारखान्याने पहिली उचल ३००० रुपये टन दिली असून, ६ मे रोजी १०० रुपये टन दुसरे बिल दिलेले आहे. मात्र शेतकरी सभासदांना शेतीच्या मशागतीची, लागवडीची कामे, मुलांच्या शिक्षणाची प्रवेश फी यासाठी पैशांची आवश्यकता आहे.यासाठी कारखान्याने खोडकी बिल २०० रुपयेप्रमाणे द्यावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.याशिवाय, गेल्या हंगामात चेअरमन व संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.तोडणी कामगारांकडूनही शेतकऱ्यांची लूट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सभासद व गेटकेनधारकांना संचालक मंडळाने मनमानी कारभार करून व सभासदांचा तोटा करून समान दर दिला, तर शेतकरी कृती समिती तीव्र आंदोलन करणार करेल असे काकडे यांनी सांगितले.