सांगली : ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने ऊस तोडणी मुकादम, मजुरांची गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे सक्तीने नोंदणी केली पाहिजे. या महामंडळाकडे नोंदणी असेल तरच साखर कारखान्यांनी संबंधित मुकादम, मजुरांशी ऊसतोडणीचे करार केले पाहिजेत, अशी संदीप राजोबा यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे बैठकीत केली.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी साखर आयुक्त सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची बैठक मंगळवारी पुणे येथे झाली. या बैठकीतील माहिती संदीप राजोबा यांनी दिली. राजोबा म्हणाले, महाराष्ट्रामधील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस तोडणी वाहतूकदार व मुकदम मजुरांची करार पद्धती ही ऑनलाइन केली पाहिजे. ऊसतोडणी मजूर आणि मुकादम यांची गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे नोंदणी असल्याशिवाय साखर कारखान्यांनी मुकादमांशी करारच करू नये, अशी मागणी केली आहे. त्यानुसार साखर आयुक्तांनी मुकादम व मजुरांशी मुंडे महामंडळाकडे नोंदणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. बैठकीस संजय खताळ, अजित चौगुले, भरत केंद्रे, अभय गीते, महेश झेंडे, सचिन बराटे आदी उपस्थित होते.