पुणे : यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला स्थगिती देण्याची साखर आयुक्तांकडे मागणी

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची थेऊर येथील ९९.२७ एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांना विक्री करण्याच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी कारखान्याच्या सभासद कृती समितीने साखर आयुक्तांकडे केली आहे. कारखान्याच्या मालकीची जमीन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. त्यांच्या संमतीशिवाय जमीन विक्रीस काढली आहे. कारखान्याला एकूण देणी किती आहेत, याचा कोणताही ताळेबंद हिशोब सभासदांना दिलेला नाही. जाहीर लिलाव पद्धत वापरली नाही असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

याबाबत सभासद कृती समितीच्या विकास लवांडे, अलंकार कांचन, लोकेश कानकाटे, राजेंद्र चौधरी यांनी सदस्यांच्या वतीने साखर आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्री प्रस्ताव सभासदांच्या उपस्थितीत मंजूर करून घेतला. मात्र, जमीन विक्रीच्या निर्णयाला सभासदांचा विरोध आहे. त्या निर्णयाला स्थगिती देऊन मनमानी कारभाराची चौकशी करावी. कारखान्याच्या रयत सर्व सेवा संस्थेकडून कारखान्याला जवळ पास १३-१४ कोटी रुपये येणे आहे. हे अनेक लेखा परीक्षण अहवालात व कलम ८३ कलमच्या चौकशी अहवालात स्पष्ट झालेले आहे. त्याशिवाय १० डिसेंबर २०१४ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळावर जबाबदारी निश्चिती केलेली आहे. त्याची वसुली केली जावी. सभेपूर्वी नियमानुसार कारखान्याच्या सभासदांना अंदाजपत्रक, ताळेबंद, सभेची नोटीस दिलेले नाही असे आक्षेप नोंदवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here