पुणे : रुई (ता. इंदापूर) येथील उसाच्या फडात कडाक्याच्या थंडीतही खेळणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथे ऊस तोडणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांच्या मुलांना मदतीचा हात मिळाला. येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी फडातील सुमारे डझनभर मुलांना नवीन कपडे व खाऊचे वाटप केले.
सध्या कडाक्याची थंडी असूनही ऊस तोडणी मजूर मात्र दिवस उगविण्याच्या अगोदर ऊस तोडणीसाठी फडात पोचत आहेत. पुरुष मजुराच्या हातात कोयता तर महिलेच्या कडेवर पोरं असे चित्र सर्रास पाहायला मिळते. दिवसभर उसाच्या फडात खेळणाऱ्या या मुलांच्या अंगावरील फाटलेली कपडे त्यांच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारी असतात, अपार कष्ट करूनही पोट भरण्यापलिकडे कसलेही स्थैर्य प्राप्त होत नाही. हंगाम संपल्यानंतर पोराबाळांना कापडं घ्यायची अन् गावाकडं निघायचं अशी प्रतिक्रिया मजुरांनी दिल्यानंतर, येथील उदयसिंह पाटील यांनी या मुजराच्या मुलांना नवीन कपडयांचे वाटप केले. वाटप केलेले कपडे लगेचच परिधान करण्यास सांगितले. नवीन कपडे घातल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आत्मीय समाधान देवून गेल्याचे उदय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडातात्या पुणेकर, ऊस वाहतूकदार दादासाहेब पाटील, धुळा पाटील, निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते.