पुणे : नीरा भीमा साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे पडघम वाजले असून, निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. याबाबत कोणाला हरकती असतील; तर २४ जानेवारीपर्यंत हरकती, आक्षेप दाखल करता येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी जारी केली आहे.

नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीकरिता कारखान्याची प्राथमिक मतदारयादी अर्हता १ जानेवारी २०२५ (कटऑफ डेट) निश्चित केली आहे. या अर्हता दिनांकास अनुसरून संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदारयादी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय यांच्यासह नीरा-भीमा साखर कारखाना, इंदापूर सहायक निबंधक कार्यालय आणि इंदापूर तहसीलदार कार्यालय या चार ठिकाणी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी व तपासणीसाठी जाहीर केली आहे.

दरम्यान, २४ जानेवारीपर्यंत येणाऱ्या आक्षेप वा हरकतींवर निर्णय घेऊन मतदार यादी अंतिम करण्यात येईल. दरम्यान दाखल हरकती व आक्षेप यांच्यावर साखर संकुल येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ३१ जानेवारी पर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. तर, कारखान्याची अंतिम मतदारयादी ३ फेब्रुवारी रोजी साखर सहसंचालक कार्यालय व नीरा भीमा कारखाना येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here