पुणे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात राजेगाव परिसरात ऊस तोडणीअभावी शेतातच पडून हे. उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या वेळेत तोडणी न झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. जानेवारी महिना निम्म्यावर आला आहे. उन्हाची चाहूल लागली आहे. परंतु पूर्व भागातील काही ऊस उत्पादक शेतकरी अद्याप ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाला तुरे फुटू लागल्याने वजन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते. तुरा आल्यानंतर काही दिवसांत तोडणी झाली नाही तर वजन घटणे व साखर उतारा कमी होत जात असल्याने नुकसानीची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. उसाची वाढही चांगली झाली आहे. परंतु वेळेत तोडणी होत नसल्याने उसाला आले आहेत, तसेच फुटवे फुटू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात उसाची शेती चांगलीच बहरली आहे. मात्र, उसाला तोडणी वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येते. याबाबत राजेगावचे शेतकरी चंद्रकांत गावडे यांनी सांगितले की, शेतकरी आपला ऊस कधी तुटून जाईल, याच्या प्रतीक्षेत आहेत. उसाला तोड मिळावी म्हणून कारखान्यांचे विभागीय कार्यालय, संबंधित अधिकारी, ऊस तोडणी मुकादम, ऊस वाहतूकदार, नेत्यांकडे चकरा मारत आहेत.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.