पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या गळीत हंगामाचा होणार प्रतिकूल परिणाम

पुणे : राज्याच्या मंत्री समितीने ऊस क्षेत्र कमी आहे. पाऊस लांबणार आहे, साखर उतारा वाढेल अशी कारणे देत १५ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. १५ ऑक्टोबरचा मुहूर्त थेट १५ नोव्हेंबरवर गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हंगाम लांबवण्यामागे विधानसभा निवडणूक हेसुद्धा एक कारण आहे. गळीत हंगाम लांबणीवर टाकल्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. आडसाली ऊस तुटायला जवळपास पंधरा ते सतरा महिने लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीचाही हंगामाच्या प्रारंभावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. हंगाम मार्चच्या पुढे ढकलला जाऊन शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा आणि तोडणी मजुरांकडून पैसे मागणीचा सामना करावा लागणार आहे.

खरेतर आडसाली ऊस लागवड १ जुलैपासून ऑगस्टअखेर केली जाते. या पार्श्वभूमीवर १५ नोव्हेंबरला कारखाने सुरू केले तरी रूळायला पंधरा दिवस जाणार आहेत. अशात १५ नोव्हेंबरच्याच आसपास मतदानाची तारीख असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाखो ऊसतोड मजूर मतदानाचे कर्तव्य बजावायला जातील आणि हंगाम विस्कळित होईल, अशीही भीती आहे. डिसेंबरपासूनच हंगाम रुळावर येणार आणि आडसाली फेब्रुवारीपर्यंत तोडावा लागणार आहे. याबाबत खडकी (दौंड) येथील महेश भागवत म्हणाले की, पावसामुळे, साखर उताऱ्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण ज्यांनी लवकर लागवडी केल्या त्या शेतकऱ्यांना त्रास होणार आहे. मांडकी (पुरंदर) येथील अंकुश जगताप म्हणाले की, उतान्याच्या नावाखाली घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आणि मागील वर्षाप्रमाणेच ऊस तुटायला सोळा- सतरा महिने लागणार आहेत. हंगाम ऑक्टोबरमध्येच सुरू व्हायला पाहिजे. शेतकरी उसात हुमणीने त्रस्त असून कधी कारखाना ऊस नेतोय असे त्याला वाटत आहे. हंगामाच्या अखेरीस उन्हाचा चटका वाढून तोडणी यंत्रणेला पैसे द्यावे लागणार आहेत असे शेतकरी बिपीन मोहिते, रामदास कोरडे यांनी सांगितले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here