पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-१९ सालच्या मुदत ठेव व्याजाच्या रकमेतून बेकायदेशीरपणे रक्कम कपात केली आहे. ही रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कारखान्याकडे अर्ज केला असून २६ सटेंबर रोजी झालेल्या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत मुदत संपलेल्या परतीच्या ठेवी व त्यावरील व्याज सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचे ठरले होते. मात्र, संचालक मंडळ हेतुपुरस्सर ऊस रोपांचे पैसे कपात करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांची येणी बाकी व इतर कपाती चालू येणाऱ्या ऊसबिलातून घेणे गरजेचे आहे. मात्र, दीपावलीमध्ये सभासदांना चार पैसे मिळू नयेत, अशी आडमुठी भूमिका संचालक मंडळाने घेतली. राज्यात ३५७१ रुपये मे. टन उच्चांकी भाव दिला असे कारखाना सांगतो. कारखान्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे. परंतु, कारखान्याने सुमारे ३ कोटी रुपये बेकायदेशीरपणे कपात केले आहेत. ते पैसे तत्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावेत; अन्यथा आंदोलन करू असा इशारा सतीश काकडे यांनी दिला.