पुणे : विघ्नहर कारखान्याने ३५०० रुपये ऊस दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

पुणे : शेतकरी संघटनेने विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी भेट घेऊन त्यांना ऊस दराबाबत निवेदन दिले. हंगा २०२४-२५ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रती मे. टन ३५०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ, अंबादास हांडे, शेतकरी युवा संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे, संभाजी पोखरकर, अजित वालझडे उपस्थित होते. विघ्नहर कारखान्याची ऊसतोडणी उशिरा होत असल्याने शेतकरी नाराज आहेत असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ म्हणाले, विघ्नहर कारखान्याचा कारभार निश्चित चांगला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, यंदाच्या वर्षी उसाची तोडणी वेळेवर होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कारखान्याच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विघ्नहर कारखान्याने पहिली उचल २६२० रुपये दिली. त्यातही वाढ करावी. उसाची तोडणी वेळेवर होईल, याकडे लक्ष द्यावे. उसाला अंतिम बाजारभाव ३५०० रुपये द्यावा. यावर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर म्हणाले की, कारखान्याच्या नवीन मिलचे काम सुरू असल्याने यंदा ऊस गाळपाचे नियोजन काही अंशी कोलमडल्याची कल्पना संचालक मंडळाला आहे. पुढील वर्षी अशी परिस्थिती राहणार नाही. तसेच, उसाला योग्य बाजार भाव दिला जाईल. कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here