पुणे : यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम शासन निर्णयानुसार १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. परिणामी कारखाना प्रशासनाची गळीत हंगामाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. दिवाळीचा सण व विधानसभा निवडणूक येत असल्याने साखर कारखाने उशीरा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. ऊस कमी असल्याने गेल्यावर्षी गाळपासाठी साखर कारखानदारांना मोठी कसरत करावी लागली होती. यावर्षीदेखील तशीच परिस्थिती निर्माण होईल असे दिसत आहे. अनेक ठिकाणी गुऱ्हाळे सुरू झाल्याने शेतकरी गुऱ्हाळांकडे वळला आहे. त्यामुळे कारखानदारही धास्तावले आहेत.
गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यापैकी ३ साखर कारखाने हे गळीत हंगामासाठी बंद होते. यामध्ये दौंडमधील अनुराज शुगर्स साखर कारखाना, शिरूरमधील घोडगंगा साखर कारखाना व भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना चालू झाला नव्हता. तालुक्यातील चार साखर कारखान्यांपैकी अनुराज शुगर्स गेल्यावर्षी चालू झाला नसल्याने भीमा सहकारी साखर कारखानाचे गाळप ६,३६,९३३ मेट्रिक टन झाले. तर दौंड शुगर्सचे गाळप १८,०१,८७७ मेट्रीक टन गाळप झाले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांचे गाळप ५,९५,००० मेट्रीक टन झाले. या तिन्ही कारखान्याचे गाळप ३०,३३,८१० मे टन एवढे झाले. यावर्षी दौंड शुगरने २० लाख मेट्रीक टन गाळप उद्दीष्ट समोर ठेवले असल्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सांगितले आहे. तर भीमा पाटस १० लाख मेट्रीक टन गाळप उद्दीष्ट ठेवले आहे. कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने यावर्षीचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीमध्ये मोळी टाकण्याचा कार्यक्रमदेखील कारखाना प्रशासन स्तरावर करण्यात येणार आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.