पुणे : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केले. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. ७) पासून १५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच अर्ज दाखल होऊ लागले आहेत. अनेक सभासदांमध्ये करखान्याच्या निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. श्री छत्रपती कारखान्यामधून सुमारे ३०० सभासदांनी आतापर्यंत बाकी नसल्याचे दाखले घेतले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
कारखान्याची निवडणूक पाच वर्षांनी लांबल्याने अनेक इच्छुकांचे कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष होते. कारखान्याची निवडणूक जाहीर होत आहे हे लक्षात आल्यानंतर मागील आठ दिवसापासून अनेक इच्छुकांनी कारखान्यामधून बाकी नसल्याचे दाखले घेण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा एक पॅनेल उभा राहत असून १९९२ नंतर जिजामाता पॅनेल पुन्हा उभा करण्यासाठी सुनील काळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सुनील काळे यांचा एक पॅनेल या निवडणुकीत उभा राहत आहे. याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे तानाजीराव थोरात यांनीदेखील पॅनेल उभा करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचादेखील एक पॅनेल उभा राहण्याची शक्यता आहे.