पुणे : दौंड तालुक्यातील दौंड शुगर साखर कारखान्याने उसाला प्रतिटन २६०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पंधरवड्यात तुटलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमादेखील करण्यात आले आहे, अशी माहिती दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली. तसेच चांगल्या दरासाठी केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणीही केली आहे. दौंड शुगरने ८ लाख ६८ हजार टन गाळप करत ६ लाख ४७ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. रसापासून इथेनॉलनिर्मितीमुळे दैनंदिन साखर उतारा ८.२५ टक्के तर सरासरी ७.६८ टक्के आहे.
मागील दोन हंगामांत ऊस मिळवण्याच्या स्पर्धेत साखर कारखान्यांनी २८०० ते ३००० रुपये प्रतिटन अशी एफआरपीपेक्षा जास्त पहिली उचल दिली होती. चालू हंगामात साखरेचे दर ३३०० रुपयांवर घसरले आहेतच शिवाय अन्य खर्चात, तोडणी वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने कारखाने चिंतेत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना तर किमान ३ हजारांची अपेक्षा आहे. काहींनी ३३०० रुपयांचीही अपेक्षा केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. यापैकी केवळ श्रीनाथ कारखान्याने प्रतिटन २६०० रुपये पहिली उचल देत कोंडी फोडली होती. आता दौंड शुगरनेही तोच ट्रेंड फॉलो करत २६०० रुपयांची पहिली उचल दिली आहे. सहकारी कारखाने काय उचल देतात याकडे लक्ष लागले आहे.
जगदाळे म्हणाले, की आमची पायाभूत एफआरपी २५५८ रुपये आहे ४२ रुपयांची भर टाकून पहिली उचल २६०० रुपयेप्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बिल अदा केले असून दुसऱ्या पंधरवड्याचे बिलही येत्या आठवड्यात अदा करणार आहोत. कारखान्यांचे तोडणी वाहतूक खर्च ९०० ते १००० रुपये प्रतिटनावर पोहोचले आहेत. त्यामुळे केवळ इथेनॉल व विजेचे पैसे मिळून चालणार नाही. मुख्य उत्पादन असलेल्या साखरेलाच चांगले दर हवेत यासाठी साखरेस ४००० रुपये एमएसपी (किमान विक्री मूल्य) हवी, असे वीरधवल जगदाळे म्हणाले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.