पुणे : निवृत्तीनगर-धालेवाडी (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या हंगामातील गाळपाला आलेल्या उसाला पहिला हप्ता २,६२० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. कारखान्याचे यंदाच्या वर्षी गाळपाचे उद्दिष्ट ११ लाख मेट्रिक टन आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार दिवंगत निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ कारभार करत आहे. उसाची तोडणी क्रमवारीने केली जात आहे. कारखान्याचा कारभार अतिशय पारदर्शकपणे व सभासदहिताचा केला जात आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
विघ्नहर कारखान्याने २१ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले. कारखान्याने आजअखेर १ लाख ५१ हजार ६३० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्यापासून १ लाख ५० हजार ५०० साखर पोती उत्पादित झाली आहेत. साखरेचा सरासरी उतारा १०.४५ टक्के इतका मिळाला आहे, असे अध्यक्ष शेरकर यांनी सांगितले. दरम्यान, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले की, भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत ३ लाख ४२ हजार मेट्रिक टन ऊसगाळप केले आहे. ३ लाख ४७ हजार ५०० साखर पोती उत्पादित केली आहेत. साखरेचा सरासरी उतारा १०.२४ टक्के इतका आहे. विघ्नहर कारखान्याने पहिली उचल जमा केल्याने शेकडो सभासद शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हे सुद्धा वाचा: पुणे : सर्वाधिक ऊस गाळपात बारामती ॲग्रो, दौंड शुगरची आघाडी
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.