पुणे : पुरंदर तालुक्यात एकाचा गावातील पाच शेतकऱ्यांनी घेतले एकरी १०० टन ऊस उत्पादन

पुणे : बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अनेक प्रयोगशील ऊस उत्पादक एकरी उसाचे १०० टन उत्पादनासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहे. मांडकी (ता. पुरंदर) गावातील पाच शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन उत्पादन घेण्याची निकोप स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेमध्ये प्रयोगशील शेतकरी संजय जगताप यांनी यंदाच्या हंगामात को ८६०३२ जातीचे एकरी ११० टन उत्पादन घेतले. शेतकऱ्यानी सुधारित तंत्राने पीक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात चांगली वाढ मिळाली आहे. तर त्यांचा आदर्श घेत अनेक प्रयोगशील शेतकरी यंदा एकरी उसाचे शंभर टन उत्पादन घेण्यासाठी सरसावले आहेत.

मांडकी गावातील ११३० ऊस उत्पादक साखर कारखान्यांचे सभासद आहेत. जमीन मशागत, खतांचा संतुलित वापर, आंतरमशागत आदी पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी भर दिला. कारखान्याकडून गेल्यावर्षी उसाला ३,६७१ रुपये प्रती टन दर मिळाला होता, यंदा गावातील पाच शेतकऱ्यांनी १०० टन ऊस उत्पादनापर्यंत मजल गाठली. सध्या गावातील २५ शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांहून अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा गावातील २० शेतकऱ्यांनी ९० टन उत्पादनापर्यंत झेप घेतली आहे. याबाबत कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या मांडकी गाव शिवारातील पाच शेतकऱ्यांनी सुधारित तंत्राने उसाचे एकरी १०० टन उत्पादन घेतले आहे. हे अनुभव इतर शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here