पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी पत्रकार परिषदेत सुळे यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी पृथ्वीराज जाचक यांनी घ्यावी, अशी आमची अनेक दिवसांपासून मागणी होती. कारण श्री छत्रपती साखर कारखान्यासाठी जाचक कुटुंबीयांचे योगदन फार मोठे आहे, असे मत व्यक्त केले.
खासदार सुळे म्हणाल्या की, श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक हा राजकीय विषय नसून तो शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा विषय आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी नेहमीच शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून समाजकारण, राजकारण केले आहे. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले की, मागील दोन दिवसांत आम्ही सर्व शेतकरी कृती समितीच्या सर्वपक्षीय मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्याला राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटनेसह सर्वच पक्षांचे सभासद उपस्थित होते. आता सुप्रिया सुळे यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, उद्योजक कुणाल जाचक, सतीश काटे, शहाजी शिंदे, अमोल भिसे, अशोक घोगरे, आबासाहेब निंबाळकर, बाबा निंबाळकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.