पुणे : ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आश्वासन देवून साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मांडवगण फराटा येथील बबन बाळासाहेब कोळपे (३८) यांनी शिरूर पोलिसांत दिली. पोलिसांनी याप्रकरणी चंदर ताराचंद राठोड, ताराचंद जयराम राठोड, मुकादम अनिल ताराचंद राठोड (सर्व रा. पिंपरखेड, गोरखपूर तांडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४ जून २०२३ पासून १ ऑक्टोबर २०२४ या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला.
संशयितांनी बबन कोळपे यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी कोळपे यांनी १० लाख ९५ हजार रुपये संबंधितांना दिले. मात्र, मजूर आले नाहीत. त्यानंतर कोळपे यांनी मजूर कधी येणार आहेत, याबाबत चौकशी केली असता, मजूर नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले आहेत. कारखाना चालू होण्याचे अगोदर पंधरा दिवस आधी मजूर येतील असे सांगितले. त्यानंतर कोळपे हे पिंपरखेडा येथे जावून मुकादम अनिल राठोड याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मजूर उपलब्ध नसल्याचे सांगत आम्ही तुमचे पैसे परत देतो असे चंदर राठोड याने सांगितले. कोळपे यांना आधी एक लाख रुपये आणि नंतर चाळीस हजार रुपये दिले. उर्वरित नऊ लाख ५५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे कोळपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.