कळस : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊस पिकावर प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा औषधे आणि खतांच्या वापरावरील खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यात सुमारे ५० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभरातील २५ हजार शेतकरी जोडले गेले आहेत अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. इंदापूर तालुक्यातील रुई येथे इंदापूर तालुका अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
सुनंदा पवार म्हणाल्या की, स्व. अप्पासाहेब पवार यांनी संस्थेचा वापर समाजकारणासाठी केल्यामुळे जगातील ४८ देशांनी याची दखल घेतली आहे. शेतकऱ्यांनी शेती व घरगुती वापराच्या विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज बनले आहे. इंदापूर तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीचे वैभव पाटील यांनी इंदापूर तालुका शेतकरी कंपनीच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. कृषी जागरणचे अब्दुस समद, महिंद्रा ट्रॅक्टरचे चव्हाण, झायडेक्सचे प्रवीण माने, देहातचे विशालराजे भोसले, आवादाचे अजय पाटील, सरपंच नयना पाटील, डॉ. रुपाली बंडगर आदी उपस्थित होते. तानाजी मारकड यांनी सूत्रसंचालन तर संतोष गोडसे यांनी आभार मानले.